तीन मुलं पोरकी, चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा केला होता खून
मंडणगड:- चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डाेक्यात काेयत्याने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (६ जून) दुपारी काेंडगाव (ता. मंडणगड) येथे घडली. या घटनेनंतर संपूर्ण मंडणगड तालुका हादरून गेला आहे. या खूनप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.
मंगेश नीलेश पवार (वय २५, रा. काेंडगाव – पणदेरी, मंडणगड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे, तर वैशाली मंगेश पवार (२२, रा. कोंडगाव – पणदेरी, मंडणगड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रामभाऊ सखाराम पवार (६५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार,पती मंगेश याला पत्नी वैशाली पवार हिच्या चारित्र्यावरून संशय हाेता.
या संशयावरून त्याने शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या पत्नीच्या डाेक्यात काेयत्याने वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मंडणगड पाेलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मंगेश पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पाेलिसांनी त्याला अटक केली आहे.
वैशाली पवार ही मूळची मंडणगड येथील राहणारी आहे. मंगेश पवार याच्याशी लग्न झाल्यानंतर ती महाड (जि. रायगड) येथील पाबर येथे राहत हाेती. त्यांना दाेन मुली आणि एक मुलगा आहे. मात्र, या घटनेनंतर तीनही मुले आईविना पाेरकी झाली आहेत.
मंगेश आणि वैशाली हे दाेघेही माेलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत हाेते. आंबा हंगामात पणदेरी – काेंडगाव येथे आंब्याच्या बागेत काम करण्यासाठी हे दाेघेही आले हाेते. आंबा बागेतील कामे आटाेपल्याने दाेघेही पुढील दाेन-चार दिवसांत पुन्हा आपल्या गावी रायगडला जाणार हाेते. मात्र, त्यापूर्वीच मंगेशने पत्नीचा खून करून तिचा जीवन प्रवास संपवून टाकला.









