कार बाजूला घेण्यावरून वाद; कोकणनगर येथे एकावर तिघांकडून प्राणघातक हल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरीतील कोकणनगर, ग्रीनपार्क परिसरात कार बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अब्दुल मतिन हसनमियाँ डोंगरकर (३८) हे जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल मतिन डोंगरकर हे १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:१५ च्या सुमारास आपल्या घराच्या पायरीवर चहा पित बसले होते. त्यांच्या शेजारीच आरोपींचे घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम साहित्य येणार असल्याने आरोपी शैनाज समीर सोलकर, समीर सोलकर आणि साहील समीर सोलकर (सर्व रा. शेटयेनगर) यांनी डोंगरकर यांना त्यांची कार बाजूला घेण्यास सांगितले. यावर डोंगरकर यांनी “माझी गाडी बाजूलाच आहे, तुम्ही तुमचे काम करा” असे उत्तर दिले. या साध्या कारणावरून आरोपींचा पारा चढला आणि त्यांनी फिर्यादींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी साहील व शैनाज यांनी तेथील दगड उचलून डोंगरकर यांच्या कंबरेवर फेकून मारले. त्यानंतर समीर सोलकर याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर जोराने फटका मारला. शैनाज हिनेदेखील लाकडी दांडक्याने मारहाण केली. “गाडी बाजूला केली नाही तर फोडून टाकू आणि तुला ठार मारू,” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.

हल्ल्यात जखमी झालेल्या अब्दुल डोंगरकर यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन डोंगरकर यांचा जबाब नोंदवला.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी शैनाज सोलकर, समीर सोलकर आणि साहील सोलकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.