रत्नागिरी:- मुख्यमंत्र्यांची रत्नागिरीतील सभा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी गाजवली. भाषणासाठी उभे राहताच ‘काय तो डोंगार, काय ती झाडी, काय ते हाटील’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून निघाला आणि शहाजीबापू पाटील व्यासपीठावरुन गरजले. हा व्हिडीओ असाच फिरत मातोश्रीवर जावा, हा जनसमुदाय मातोश्रीला दिसावा, असे बोलताच सर्वत्र टाळ्यांचा गडगडाट झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला रत्नागिरीत शहाजीबापू पाटील यांनी हजेरी लावली. शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य दिसून आले. हे चैतन्य त्यांच्या भाषणातून दिसून आले. आपल्या भाषणातून आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
मेंढरांसारखं हॉटेलात कोंडलं
राजकारण कुणासाठी थांबत नसते. तुम्ही मतं युतीला दिली. मात्र ज्यावेळी निवडून आल्यानंतर आम्ही मुंबईत गेल्यावर नेमकी गद्दारी कुणी केली. तुम्ही गद्दारी केली आणि आम्हाला गद्दार म्हणताय? मेंढरं जशी कोंडतात त्याचप्रमाणे आम्हाला हॉटेलात कोंबल्याची टीका आ. शहाजीबापू पाटील यांनी केली.
खोक्याच्या अवलादी तुमच्या
यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, खोक्याच्या अवलादी तुमच्याच… आम्ही शेतकर्याची अवलाद..आम्हाला बदनाम करण्याचे कट-कारस्थान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाची नोंद इतिहासात होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
आम्ही बाजीगर
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आम्ही कोणतंही पाप केलं नाही तर कणकखर नेतृत्त्व पुढे घेऊन आलो. आम्ही बाजीगर आहोत. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. त्यामुळे आम्ही कुठल्याही कटकारस्थानाला भीत नाही. राष्ट्रवादी व कॉंग्रेसरुपी वाळवी पोखरत होती. म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
ते पुढे येत नाहीत
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, टीका करायला बापलेक पुढे येत नाहीत. भाड्याने घेतलेली लोकं टीकेसाठी सोडली आहेत. मात्र वारकरी संप्रदायावर झालेल्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्राची जनता तुम्हाला एक मत देणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पाठीशी उभे रहा
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, रत्नागिरीकरांना उदय सामंतांच्या नेतृत्त्वाची नोंद घ्यावीच लागेल. तुमच्यासाठी काम करणार्या या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. पावनखिंड लढवणार्या बाजीप्रभूसारखे आपण लढूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जाताजाता डायलॉग
भाषणाच्या शेवटी जाताजाता शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीचा डायलॉग मारला आणि सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं काही ओके हाय’ असे म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.