काताळेत पायवाटेच्या वादातून पाच जणांना मारहाण

गुहागर:- गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी येथे जमिनीतून जाणाऱ्या पायवाटेच्या वादावरून फिर्यादी याच्यासह आई-वडील व दोन भावांना काठ्या तसेच लाथा बुक्के यांनी जबर मारहाण करत गंभीर दुखापत केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये नऊ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील काताळे, कदमवाडी येथील मकरंद रमेश कदम (२४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या जागेतून जाणाऱ्या पायवाटेच्या वादातून नऊ जणांनी मुकरंद यांच्यासह त्याचे आई- वडील व दोन भाऊ यांना लाथा बुक्क्यांसह काठ्यानी मारहाण करत दुखापत केली. तसेच ‘घराच्या बाहेर पडा तुम्हाला आम्ही सोडणार नाही’ अशी धमकी देत शिवीगाळही केली.

गुहागर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ११५(२), ३५२, ३५१ (२), १८९(२), १९१(२), १९१(३) प्रमाणे रुपेश रवींद्र सावंत, प्रसाद रवींद्र सावंत, बळीराम रवींद्र सावंत, रवींद्र उर्फ (प्रकाश), रेश्मा रवींद्र सावंत, रेखा रवींद्र सावंत (सर्व रा. काताळे, कदमवाडी) व अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.