काडी काडी जमा करून गोळा केला संसार, पुरात झाला उध्वस्त 

आम्हाला पाणी आणि धान्य द्या – पुरग्रस्तांचा आक्रोश

चिपळूण:- चिपळूण शहराला जवळपास 30 तासांहून अधिक काळ पुराच्या पाण्याचा वेढा होता.. आता पूर ओसरला असला तरी त्याच्या खुणांवरून हा पूर किती भयानक होता ते दिसून येतं..  शहरात जवळपास 10 ते 15 फूट पाणी होतं, घरं या पुरात बुडाली तर अनेक बिल्डिंगच्या ग्राउंडचा भाग बुडून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरलं होतं, पाण्याचा एवढ्या वेगाने वाढलं की लोकांना बाहेर पडायला मार्गच मिळाला नाही, अनेकजण घराच्या छपरांवर चढून मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते. घरातील सामान वाहून गेलं, धान्य, कपडे सगळंच गेलं. जेवणासाठी धान्यही राहिलं नाही, आम्हाला पाणी आणि धान्य द्या असा आक्रोश पहायला मिळत आहे. दरम्यान चिपळूण शहरातील रामतीर्थ परिसरातील सुनील पवार यांचंही मोठं नुकसान झालं आहे. होते नव्हते ते सर्व पुरात गेले आहे.

महापुराने व्यापाऱ्यांचे अपरिमित नुकसान

चिपळूणमध्ये महापुराने व्यापाऱ्यांची किती दाणादाण उडवून दिलेली आहे, ती पुरानंतरची दृश्य बघितल्यावर लक्षात येतं. या पुराने व्यापाऱ्यांचं अपरिमित नुकसान झालं आहे. लाखो–करोडोंचं नुकसान या पुराने झालेलं आहे. चिपळूण शहरातील सर्वात मोठं खरेदी मार्केट म्हणजे किंग सुपर मार्केट, भोगाळे मध्ये असलेलं हे मार्केट पुर्णतः पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे जवळपास दीड ते दोन कोटींचं नुकसान झालेलं आहे.