काजरघाटी येथे 50 हजारांच्या ब्राऊन हेरॉईनसह दोघांना अटक

रत्नागिरी:- शहरातील अमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी पोलिसांचे धाडसूत्र सुरूच आहे. तब्बल 50 हजार रुपयांच्या ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थासह शहर पोलिसांनी दोघांना अटक केली. हि कारवाई शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.50 वा. काजरघाटी तिठ्याजवळ करण्यात आली. संशयितांकडून रोख रक्कम आणि दुचाकीसह एकूण 80 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नजफ आसिफ मिरजकर आणि मतीन महमूद शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.50 वा. काजरघाटी तिठ्याजवळ शहर पोलीसांना संशयितांकडे ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थच्या 65 कागदी पुड्या मिळून आल्या. पोलिसांनी दोघांची चौकशी केल्यावर त्याने विक्रीसाठी हा 50 हजारांचा अंमली पदार्थ आणल्याचे मान्य केले. त्यांच्याकडून रोख 300 रुपये आणि 30 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 80 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरोधात एन. डी. पी. एस. ऍक्ट कलम 8 (क ),22 (अ ) 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.