काजरघाटी पिलणकर वाडी येथे अतिवृष्टीमध्ये भुस्खलन; चार घरांना धोका

रत्नागिरी:- तालुक्यातील काजरघाटी पिलणकर वाडी येथे अतिवृष्टीमध्ये भुस्खलन झाल्यामुळे तेथील संरक्षक भिंत कोसळून जवळच्या चार घरांना धोका निर्माण झाला आहे. तेथील पंचनामे तत्काळ करून संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे काजरघाटी पिलणकरवाडी येथे भुस्खलन झाले. त्यामुळे येथील कोमल पिलणकर, विजय पिलणकर, सचिन पिलणकर, राकेश पिलणकर यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत तात्काळ महसूल खात्याने पंचनामा करून कोणतीही वित्त हानी होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे दळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तहसिलदार म्हात्रे यांना आपण स्वतः लक्ष घालावे आणि उपाय योजना करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली. या वेळी जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे , जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पटवर्धन, सरचिटणीस सुशांत पाटकर, जिल्हा किसान आघाडीचे ज्ञानेश पोतकार, अशोक वाडेकर, किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ पवार, बाधित पिलणकर वाडीतील ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.