रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी चव्हाणवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. याप्रप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार, २८ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सुरेश सिताराम चव्हाण (वय ६३) यांच्या अंगणातील एका वादग्रस्त जागेत त्यांचे लहान भाऊ गुरुनाथ सिताराम चव्हाण आणि त्यांचा मुलगा त्रिनेत्र गुरुनाथ चव्हाण हे कॉंक्रीट घालत होते. या कामाला सुरेश चव्हाण यांनी विरोध केला असता, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
आरोपी गुरुनाथ चव्हाण याने संतापून सुरेश चव्हाण यांना कुदळीच्या लोखंडी पाईपच्या दांड्याने उजव्या हातावर, पाठीवर आणि कमरेवर मारहाण केली. तसेच दोघा आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवले.
या मारहाणीदरम्यान सुरेश चव्हाण यांचा मुलगा सुमित यालाही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. सुमितला वाचवण्यासाठी आलेली त्याची पत्नी स्पृहा सुमित चव्हाण ही ७ महिन्यांची गरोदर असतानाही, आरोपीच्या हातातील कुदळीचा दांडा तिच्या पोटाला लागला. या झटापटीत सुमित गडावरून खाली पडल्याने त्याच्या पाठीला आणि पायाला मुका मार लागला आहे.
याप्रकरणी सुरेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी गुरुनाथ चव्हाण आणि त्रिनेत्र चव्हाण यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









