कांदळवन उवजीविका योजनेतून जिल्ह्यातील 18 गावांत रोजगार

रत्नागिरी:- कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना समुद्रकिनारपट्टी भागातील बचतगटांसाठी रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे. पाच जिल्ह्यातील 122 गावांमध्ये सन 2022-23 मध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपजीविका प्रकल्पातून 289 बचतगटांनी जून महिन्या अखेर 71 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 18 गावांमध्ये सुमारे 44  बचतगटांनी 8 लाख 90 हजार 219 रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

कोकण किनारपट्टीवर व खाडीकिनार्‍यावर हजारो हेक्टर कांदळवनाचे क्षेत्र आहे. त्सुनामीच्यावेळी कांदळवनाचे महत्व लक्षात आल्यानंतर याच्या संवर्धनावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. राज्यामध्येही कांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने मागील काही वर्षापासून वन विभागाच्या माध्यमातून कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेंतर्गत किनारपट्टीवर काम सुरु आहे. मागील पाच वर्षांपासून सुरू झालेल्या योजनेच्या अंमलबजावणीकरिता गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. सामुहिक गटांमार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांना 90 टक्के, वैयक्तिक प्रकल्पांना 75 टक्के अनुदान दिले जात आहे.  
सन 2017 ते जून 2022 या कालावधीत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 122 गावे योजनेच्या अंमलबजावणीकरीता निवडण्यात आली आहेत. खेकडा पालन, पिंजर्‍यातील मत्स्यपालन, गोड्या, खार्‍या पाण्यातील शोभिवंत मत्स्यपालन, कालवे पालन, शिंदाणे पालन, निसर्ग पर्यटन यासारखे उपक्रम योजनेंतर्गत राबविले जात आहेत.

पहिल्या वर्षी पाच सागरी जिल्ह्यातून विविध प्रकल्पातून 57 लाख 28 हजार 129 रुपयांचे उत्पन्न मिळाले. 3557 ग्रामस्थांनी यात थेट सहभाग नोंदविला. सर्वाधिक उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याने 38 लाख 41 हजार 608 रुपयांचे मिळवले. रत्नागिरी जिल्ह्याने 7 लाख 96 हजार 652 रुपयांचे उत्पन्न मिळविले होते.

सन 2022-23 या वर्षी विविध उपजीविका प्रकल्पातून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा 71 लाख रुपयांवर गेला आहे. 8 महिने बचतगटांना अथक परिश्रम घ्यावे लागतात. मासे, खेकडे, कालवे, शिंपले यांचे संवर्धन केले जाते. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कांदळवन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.