रत्नागिरी:- शहरातील कॉग्रेस भुवन येथील एका हॉटेलच्या समोर मोकळ्या जागेत पार्क केलेल्या गाडीच्या काचा फोडून चोरट्याने ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. केवळ दीड तासाच अज्ञात चोरट्याने ही किमया केली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १९) रात्री आठ ते नऊ च्या सुमारास कॉग्रेस भुवन येथील व्हेज स्ट्रीट हॉटेलच्या समोरील मोकळ्या जागेत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेशकुमार लच्छाराम चौधरी (३१, रा. सदगुरु दिगंबर प्लाझा, पऱ्याची आळी, रत्नागिरी) यांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास मोटार (क्र. एमएच-०८ ८४३४) हॉटेल समोरील मोकळ्या जागेत पार्क करुन ते व्हेज स्ट्रीट हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने गाडीच्या डावीकडील मागील दरवाजाची काच फोडून गाडीमध्ये ठेवलेले पर्स मधील दोन मोबाईल, ८०० रुपयांची पर्स, रोख रक्कम ४ हजार ५०० असा सुमारे ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमालावर डल्ला मारला. जेवण झाल्यानंतर चौधरी हे गाडी जवळ आल्यावर त्यांना हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









