एका महिलेवर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- कसबा, भेंडीबाजार, संगमेश्वर येथे ११ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कु. प्रतिभा अंबादास कांबळे (मूळ रा. उस्माननगर, नांदेड) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वेदांत तुकाराम भिसे (२४, व्यवसाय नोकरी, मूळ रा. उस्माननगर, मातंगवाडा, ता. कंधार, जि. नांदेड, सध्या रा. कसबा, भेंडीबाजार, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने संगमेश्वर पोलिसांत फिर्याद दिली.
त्याच्या तक्रारीनुसार, कु. प्रतिभा कांबळे ही शुक्रवारी सकाळी भिसे यांच्या घरी येऊन वेदांत व त्यांच्या नातेवाईकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुम्हाला बघून घेते,” अशी धमकीही तिने दिली. वेदांत यांच्या आईने आरोपीला घरात प्रवेश करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला असता, तिने त्यांना बाजूला ढकलून दिले आणि जबरदस्तीने घरात घुसली. घरात घुसून तिने वेदांत यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर, घरातील तांब्या घेऊन ती घराबाहेर आली. धक्कादायक बाब म्हणजे, तिने सोबत आणलेल्या उंदीर मारण्याच्या औषधाची पावडरची पुडी त्या तांब्यातील पाण्यात टाकली आणि ते पाणी प्यायले.
हा प्रकार पाहून तेथे जमलेल्या लोकांनी आणि वेदांत याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने “तुम्ही कोणीही मध्ये यायचे नाही, नाहीतर मी तुमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देईन,” असे धमकावले. तसेच, “आज मी तुम्हांला जेलमध्ये जायला लावणार आहे. तुमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे,” अशा धमक्याही तिने वेदांत आणि त्यांच्या नातेवाईकांना दिल्या.
या घटनेची माहिती मिळताच, संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कु. प्रतिभा अंबादास कांचळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.