कशेळीनजीक महामार्गावर ओढ्यात कोसळली कार

रत्नागिरी:- गेले २ वर्ष मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चौपदरीकरणाचे काम सुरू असून ते अद्यापही पाली विभागातील खानू ते नाणीज या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी रखडलेय. त्याचा फटका शुक्रवारी मध्यरात्री कशेळी पुलानजीक असणाऱ्या ओढ्याच्या अपूर्ण कामाच्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने कार व टेम्पो ओढ्यात जाऊन अडकले. यावेळी रस्त्यावर ५ ते ६ फुट उंच पाणी वाढल्याने महामार्ग जवळपास ४ तास बंद होता.

रात्री १२च्या दरम्यान पाणी थेट ५ ते ६ फुट उंच महामार्गावर आले. तसेच तेथे कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नसल्याने महामार्गावरून जाणाऱ्या एका स्विफ्ट कारचालकाला चिखलमिश्रित पाणी महामार्गावर असल्याने मुसळधार पावसात रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज आला नाही. परिणामी कार चालकासह ओढ्यात पडली व टेम्पो ओढ्यात जाऊन अडकला. यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी त्या कारचालक व अन्य एकाला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने महामार्ग पहाटे ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. महामार्गावर रस्त्याच्या कामाचे ठेवलेले सिमेंटचे वीस फुटी गर्डरही ओढ्यात कलंडून पडले. वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्या ठिकाणी पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, हे.कॉ. तृप्ती सावंतदेसाई, कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबाचे पोलीस कर्मचारी, नाणीज पोलीस पाटील नितीन कांबळे व स्थानिक युवकांनी ती कार ओढ्यातून बाहेर काढण्यास मदत केली. कंत्राटदार कंपनीने माती टाकून बुजवलेला ओढ्याचा प्रवाह मोकळा केल्यानंतर पहाटे ५ च्या दरम्यान महामार्गावरील पाणी ओसरल्यावर महामार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला.