Tuesday, July 21, 2026
spot_img
Home खेड कशेडी घाटात भरधाव कार पोलवर आदळली

कशेडी घाटात भरधाव कार पोलवर आदळली

दोघे जखमी; चालकावर गुन्हा दाखल

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी येथील ओझरवाडी परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना १७ जुलै रोजी सकाळी घडली. अतिपावसामध्ये गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट मध्य दुभाजकाला धडकून स्ट्रीट लाईटच्या पोलवर आदळली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी केशव एकनाथ खवणेकर (वय ५०, रा. वास्को, गोवा) हा १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या टोयोटा हायरायडर गाडीने (क्रमांक GA 06 K 0618) मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत होता. कशेडी ओझरवाडी परिसरात अतिवृष्टी सुरू असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, भरधाव वेगाने असलेली गाडी आधी रस्त्यावरील मध्य दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर रस्त्या शेजारील स्ट्रीट लाईटच्या पोलवर जाऊन आदळली.

या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, चालक आणि साक्षीदारांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजित संतोष कदम यांनी फिर्याद दिली आहे.

खेड पोलिसांनी १८ जुलै रोजी सायंकाळी ६.५३ वाजता आरोपी केशव खवणेकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अतिपावसात निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.