Monday, June 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी कळझोंडी धरणातून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा

कळझोंडी धरणातून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या कळझोंडी धरणातील पाणी गेले आठ दिवस गढूळ येत असल्याने या भागातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. या गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने तातडीने जलशुद्धीकरण यंत्रणा राबवून नियोजित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

गेली ४० वर्षे कळझोंडी धरणावर पाणी योजना सुरू आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये धरणाची उंची वाढविणे, जॅकेटिंग व ग्राऊटींचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, या धरणातील पाणी हे सरळ पंप हाऊसमध्ये सोडले जाते. या पंप हाऊसला नैसर्गिक झरे ठेवण्यात आलेले नाहीत. पूर्वीच्या पंप हाऊसला नैसर्गिक झरे होते. त्यामुळे किती ही पाऊस पडला तरी काही तासांतच पाणी स्वच्छ होत होते. मात्र, या नवीन जॅकवेल (विहीर-पंप हाऊसला) नैसर्गिक झरे न ठेवता तळापासूनच सिमेंट काँक्रीटने आरसीसी बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे हे धरणातील पाणी थेट पंप हाऊसमध्ये सोडले जाते. या विहिरीत फळ्या, खिळे, सळ्या, सिमेंट बांधकामाचे प्लायवूडचे तुकडे, कच्च्या कपऱ्या असे साहित्य पडलेले आहे.
पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही, तर येथील ग्रामस्थांनी जनआंदोलनाची तयारी केली आहे. कळझोंडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेतही या गढूळ पाणी पुरवठ्याचा विषय चर्चिला गेला होता. वरिष्ठ पातळीवर या प्रकाराची नेमकी कशी आणि कधी दखल घेतली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून या धरणाचे व पाणी पुरवठा साठवण टाक्या व जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी एका मोठ्या पावसाच्या सरीने हे जलशुद्धीकरण केंद्र निकामी झाले आहे. त्यामुळे आता गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पंप हाऊसच्या बांधकामाची गरज आहे. या जलशुद्धीकरण केंद्राची वरिष्ठ पातळीवरून पाहणी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून आता होऊ लागली आहे .