उत्तर प्रदेशातील चालकावर गुन्हा दाखल
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी- खेड येथे रस्ता ओलांडताना एका भरधाव कंटेनरने धडक दिल्याने ८० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मयत तुकाराम भागोजी बोबले (वय ८०, रा. कळंबणी बुद्रुक, ता. खेड) हे २१ एप्रिल रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास घरगुती सामान आणि बिस्किटचा पुडा आणण्यासाठी कळवणी हॉस्पिटलशेजारी असणाऱ्या भवड यांच्या टपरीकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना, खेडकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर क्र. MH 46 BB 0826 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय भरधाव वेगात आणि बेदरकारपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात तुकाराम बोबले यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी फिर्यादी संतोष शांताराम बोबले (वय ५०, रा. उधळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, कंटेनर चालक अरशद सईद अहमद (वय २३, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









