कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात लेखा कर्मचारी संघटना आक्रमक

जि. प. सीईओ जाखड यांची घेतली भेट 

रत्नागिरी:- टायपिंग, जातपडताळणीसह विविध गोष्टींची पुर्तता न करणार्‍या सुमारे पन्नास कर्मचार्‍यांना सेवा निवृत्तीच्या वाटेवर असताना प्रशासनाकडून विभागिय चौकशीची कारवाई केली आहे. या कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाचा जाब जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाला विचारला आहे. कर्मचार्‍यांची बाजू जाणून घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

जिल्हा परिषद प्रशासनातील कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी लावण्यात आल्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत. त्यातील बहुसंख्य कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राजू जाधव, उपाध्यक्ष दिलीप नवले, मोहन कांबळे, सचिव नितिन तांबे, महिला प्रतिनिधी बिना ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांची भेट घेतली. त्यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी देखील उपस्थित होते.

नोकरीला लागताना टायपिंग आवश्यक असते. ते कोणत्या भाषेचे आहे. याचा उल्लेख शासनाने जाहीर केलेल्या नोकरीच्या संदर्भात नाही. असे असतानाही या एकाच गोष्टीमुळे अनेक कर्मचारी आता सेवानिवृत्तीच्या अखेरच्या टप्प्यात अडचणीत आले आहेत. प्रशासनाकडून कर्मचार्‍यांवर अन्याय केला जात आहे अशी बाजू सीईओंपुढे मांडली. कर्मचार्‍यांचे म्हणणे ऐकल्यानंतर सीइओंनी खातेप्रमुखांशी चर्चा केली. त्या चर्चेत कर्मचार्‍यांना विभागीय चौकशीसाठी नोटीस काढल्याची कार्यवाही अन्यायकारक असल्याचे पुढे आले. चौकशी लावलेले सर्वच कर्मचारी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे इतकी वर्षे सेवा करूनही कर्मचार्‍यात ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सेवानिवृत्ती लाभाचा एकही पैसा मिळणार नाही. ही बाब त्यांच्या आनंदावर पाणी फेरणारी आहे. या प्रश्नी कर्मचार्‍यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासन डॉ. जाखड यांनी दिले.
टायपिंग परिक्षा प्रमाणापत्र दिले नसल्याचे कारणे देत वर्षभरापुर्वी सामान्य प्रशासनमधील कक्ष अधिकार्‍यावर सेवानिवृत्तीला असतानाच विभागिय चौकशी लावली होती. विभागिय चौकशीत जिल्हा परिषदेने घेतेलेले आक्षेप खोडून काढत त्या अधिकार्‍याला आयुक्तांनी दिलासा दिला होता. हा प्रकार झालेला असतानाही त्याच कारणास्तव अन्य कर्मचार्‍यांची विभागिय चौकशी लावण्याचे कारण काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.