रत्नागिरी:- सावकारी कर्जाच्या व्यवहारातून इनोव्हा गाडी आणि रोख रक्कम लांबवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार देणार्या फिर्यादीलाच भोर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीतून अटक केली. या फिर्यादीविरोधातच भोर पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार देण्यात आल्यानंतर ही कारवाई भोर पोलिसांच्या पथकाकडून करण्यात आली.
संतोष विश्वनाथ जगदाळे (40,मुळ रा.बोपगाव,पूणे सध्या रा.सिध्दीविनायकनगर,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. 2 डिसेंबर रोजी संतोष जगदाळेने शहर पोलिस ठाण्यात गणेश रामचंद्र शेडगे (रा.भोर,पूणे) आणि इतर 5 जणांविरोधात तक्रार दिली होती.त्यानुसार, सावकारी कर्जाच्या व्यवहारातून 30 ऑक्टोबर 2020 रोजी या सहा जणांनी आपली 20 लाखांची इनोव्हा गाडी आणि रोख 10 हजार रुपये जबरदस्तीने लांबवल्याप्रकरणी तक्रार दिली होती.
दरम्यान, गणेश शेडगे याने भोर पोलिस ठाण्यात संतोष जगदाळे विरोधात तक्रार दिली होती.त्यानुसार, आपण कॉन्ट्रॅक्टर असून आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे. मात्र सध्या धंद्यात मंदी आली आहे. त्यामुळे आपल्याला पैशांची खूप गरज असल्याचा बनाव रचून संतोष जगदाळेने अनेकांकडून लाखो रुपये उकळले. फसवणूक झालेल्या यातील गणेश शेडगे, दशरथ महांगरे, मिलिंद जगताप, संकेत महांगरे, सागर राऊत, संतोष वीर, विशाल महांगरे, सतिश देवकाते आदीना जगदाळेने वेगवेगळी आमिषे दाखवून एक कोटीहून अधिक रकमेचा गंडा घातलल्याचा त्याच्यावर आरोप आहे. काहींकडून स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर देतो असे सांगूनही त्याने पैसे घेतले. त्याचप्रमाणे महाबळेश्वर येथे मोक्याच्या ठिकाणी आपली जमीन असून ती नावावर करण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी रत्नागिरीतील संतोष जगदाळे याच्या विरोधात भोर पोलीस ठाण्यात सर्वांनी स्वतंत्रपणे लेखी तक्रारी केल्या आहेत. कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून पैशाची मागणी करण्यासाठी जाणार्यांविरोधातच खोट्या तक्रारी करून त्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न जगदाळे करीत असल्याचे आरोप फसवणूक झालेल्यांनी केला आहे.या तक्रारींवरुन भोर पोलिसांच्या पथकाने रत्नागिरीत येउन संतोष जगदाळेला अटक केली.