दापोली:- तालुक्यातील करंजाणी मावळतवाडी येथे एका महिलेच्या घरात घरफोडी होऊन २१,६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १ मे ते २४ मे या कालावधीत घडली असून, या प्रकरणी राजेंद्र दत्ताराम कालेकर, संतोष दत्ताराम कालेकर आणि अंतोष दत्ताराम कालेकर या तिघांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला १ मे रोजी आपले घर बंद करून मुंबई येथे गेल्या होत्या. २४ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्या घरी परत आल्या असता, त्यांना घराच्या समोरील लोखंडी आणि लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील विविध वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये २००० रुपयांची चांदीची लक्ष्मी मूर्ती, १०,००० रुपयांची रोख रक्कम, २००० रुपयांची पितळेची लक्ष्मी, गणपती, जगदंबा आणि सरस्वती देवीची मूर्ती, ५००० रुपयांची एल.ई.डी. फ्लॅश लाइट, ६०० रुपयांचे गॅसचे पितळेचे बर्नर आणि २००० रुपयांची किचनमधील वापरती ५ ॲल्युमिनियमची भांडी यांचा समावेश आहे. एकूण २१,६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तसेच, घराचे लोखंडी आणि लाकडी दरवाजे तोडल्यामुळे सुमारे २०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी, फिर्यादी महिलेने राजेंद्र रघुनाथ कालेकर, संतोष दत्ताराम कालेकर आणि अंतोष दत्ताराम कालेकर या तिघांवर घरफोडी आणि घराचे नुकसान केल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे. दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.