कधी कार्यकर्ते तर कधी सामान्य माणूस; गर्दीची वर्दी घालत मारायचे डल्ला

रत्नागिरी:- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. गर्दीत चोरी करण्यासाठी जशी गर्दी तशी वेशभूषा या टोळीतील चोरटे करत होते. यासाठी ते कधी कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते तर कधी सामान्य माणूस बनायचे. बिडची ही टोळी गर्दीतच आपला डाव साध्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेतील प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन रत्नागिरीत काहींच्या सोन्याच्या चेन खेचल्या गेल्या होत्या. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून वेगाने तपास काम केल्याने अवघ्या काही तासातच या चेन चोरीतील टोळीमधील एकाला कणकवली येथे पकडण्यात यश आले होते. त्यांनतर पोलिसांनी तब्बल सहा जणांना बीड येथून अटक करून या टोळीचा पर्दाफाश केला होता. या तपासकामाची माहिती डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या टोळीमधे दत्ता जाधव,पर्शुराम गायकवाड, दत्ता गुंजाळ(33),सागर कारके(21), नितीन गायकवाड(24), रमेश जाधव(55), बाळू जाधव(28, सर्व रा.बीड) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत.27 ऑगस्ट रोजी संशयितांनी संगनमताने जनआशिर्वाद यात्रेत गर्दीचा फायदा घेत चार जणांच्या खांद्यावर हात ठेवून गळ्यातील 4 चेन कट करुन तसेच पाकिटमारी करुन रोख रकमेसह 2 लाख 41 हजार 800 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती.

याप्रकरणी शहर पोलिसांनी वेगाने तपास करताना गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्याआधारे एक-एक दुवा जोडत बीड येथून संशयितांना ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीतील 3 चेन व रोख रक्कम 6 हजार 800 तसेच गुन्ह्यातील स्विफ्ट डिझायकर कार व मोबाईल असा एकूण 4 लाख 38 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.संशयित हे सराईत गुन्हेगार असून ते ठिकठिकाणी होणार्‍या धार्मिक जत्रा, मेळावे तसेच रॅलींमध्ये सहभागी होउन अशा प्रकारे चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.