कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात

संगमेश्वर:- संगमेश्वर पोलिसांनी संगमेश्वर-कोल्हापूर राज्यमार्गावर लोवले दरम्यान मोठी कारवाई करत कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीसह पाच जनावरांना पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर भागोजी वाघमोडे (वय-27 वर्षे, रा. चांदोली आंबा, ता. मलकापूर, जि. कोल्हापूर) आणि पांडुरंग कोंडीबा लांबोरे (वय -32 वर्षे, रा. कांडवड, ता. मलकापूर, जि. कोल्हापूर) यांनी संगनमत करून त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी (एम.एच 08 डब्ल्यु 3491) मधून जनावरांची वाहतूक करत होते. या गाडीमध्ये 3 लाख 50 हजार रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्रमांक एम. एच 08 डब्ल्यु 3491) असून तिला लोखंडी हुड व पिवळ्या रंगाची ताडपत्री बांधलेली होती. तसेच, 20 हजार रुपये किंमतीचा काळपट राखाडी रंगाचा आठ वर्षांचा बैल, 16 हजार रुपये किंमतीचा काळा पांढरा रंगाचा बैल, 18 हजार रुपये किंमतीचा लाल रंगाचा टोकदार शिंगांचा बैल, 17 हजार रुपये किंमतीचा काळा पांढरा रंगाचा बैल आणि 10 हजार रुपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा पाडा, असे एकूण 4 लाख 31 हजार रुपयांची जनावरे कोंबून निर्दयतेने वाहतूक केली जात होती.

पोलिसांनी सांगितले की, जनावरांना आखूड दोरीने मानेला बांधून व कोंबून दाटीवाटीने हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत गाडीतील छोट्याशा जागेत वाजवीपेक्षा जास्त भरले होते. गाडीचा हौदा चारही बाजूने ताडपत्रीने बंदिस्त केला होता. तसेच, जनावरांना दुखापत होऊ नये यासाठी मॅटची सुविधा व पार्टीशनची व्यवस्था नव्हती. शिवाय, जनावरांची तपासणी केलेली नव्हती आणि त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती. आरोपींकडे जनावरे खरेदी-विक्रीची पावती तसेच वाहतूक करण्याचा परवानाही नव्हता. विना लायसन्स गाडी चालवत असलेला भागोजी भिरु कोलापटे (रा. लपाळा, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्या सांगण्यावरून सावर्डे (ता. चिपळूण) येथील मधुकर तुकाराम सावर्डेकर (वय 60 वर्षे, रा. कळवंडे, ता. चिपळूण) यांच्याकडून ही जनावरे कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5 (अ), 5 (ब), 9, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (घ) (ड) (च), महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 119, सह मोटार वाहन कायदा कलम 66/192, 3/181 सह, प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47, 48, 49, 50, 51, 54, 56 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस नाईक सचिन कामेरकर, पोलीस अंमलदार किशोर जोयशी, मनवळ आणि कोलगे यांनी ही यशस्वी कारवाई केली. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. संगमेश्वर पोलिसांनी लागोपाठ केलेल्या या प्रभावी कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.