संगमेश्वर पोलिसांचे कौतुक
संगमेश्वर:- तालुक्यातील कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवार 24 मे रोजी समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी रिजवान जुवळे या आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत असून, काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असे संगमेश्वर पोलिसांनी सांगितले.
बानू फकीर महमद जुवळे (७०, रा. कडवई) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या २ मे २०२५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची चुलत सून मुनीरा बशीर जुवळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तात्काळ बेपत्ताची नोंद घेऊन तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला.
मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. २ मे २०२५ रोजी हाजीरा मुसा माखजनकर, रिजवान महमूद जुवळे (दोघे रा. कडवई, उभीवाडी) आणि हुमायू शकील काझी (रा. फणसवणे) यांनी संगनमताने टाटा नॅनो गाडीतून (एम.एच. ०५ ए. एक्स ९०९८) बानू जुवळे यांचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे, मुनीरा बशीर जुवळे यांच्या फिर्यादीनुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यातील आरोपी रिजवान महमूद जुवळे हा सीवूड्स, मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रिजवान जुवळे आणि हुमायू शकील काझी यांनी बानू फकीर मोहम्मद जुवळे यांचा गळा दाबून खून केला आणि त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नॅनो गाडीतून कडवई ते कुंभारखाणी बुद्रुक जाणारे रोडवरील खिंडीतील जंगलमय भागात खोल दरीत फेकून दिला. २३ मे २०२५ रोजी पोलीस कोठडीत असताना आरोपी रिजवान जुवळे याने घटनास्थळी मृतदेह दाखवला. तसेच, आरोपींनी महिलेच्या अंगावरून काढलेले ३० ग्रॅम ४५० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी विकलेल्या सोनाराकडून जप्त करण्यात आले आहेत.
दागिन्यांच्या आमिषाने ७० वर्षीय बानू फकीर मोहम्मद जुवळे यांचे अपहरण करून, तिचा गळा दाबून खून करत अंगावरील दागिने काढून घेतल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दरीत फेकून देण्यात आल्याचे या गुन्ह्यातून उघड झाले आहे. हा संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ (स्थागुअशा, रत्नागिरी), पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे प्रभारी अधिकारी, संगमेश्वर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडला आहे.









