खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक्स कंपनी स्टोअरच्या गोदामामध्ये चोरी झाली होती. या चोरीतील तीन संशयितांपैकी एकाला पोलिसांनी अटक केले होते आणि काही मुद्देमाल जप्तही केला होता; मात्र दोघेजण फरार होते. त्यापैकी आणखी एकाला चिपळूण येथून अटक केली आहे. उर्वरित मुद्देमालासह शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक लिमिटेड या कारखान्याच्या स्टोअरच्या गोदामातील २ लाख ७२ हजार ६४६ रुपये ८२ पैसेइतक्या मुद्देमालाची चोरी होती.
खेड पोलिस ठाण्यात अमित तुळशीराम गायकवाड (वय ३२, रा. नवी मुंबई, ऐरोली), दत्तात्रय शिवाजी गोडसे (वय २४) व मारुती विलास गवळी (२०, दोन्ही रा. नरळेवस्ती, खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशा तिघांजणांविरुद्ध १५ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापैकी अमित तुळशीराम गायकवाड याला १५ एप्रिलला रात्री पावणेनऊ वाजता अटक केली. दत्तात्रय शिवाजी गोडसे व मारुती विलास गवळी हे दोघे फरार होते. त्यापैकी दत्तात्रय शिवाजी गोडसे (वय २४, रा. सांगोला) याला चिपळूण येथून पोलिसांनी अटक केली आणि उर्वरित मुद्देमाल जप्त केला आहे. अद्याप एकजण फरार असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.