कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

‘पुष्कर’ कंपनीच्या मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

खेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या बाहेरील आवारात उघड्यावर टाकलेल्या केमिकलयुक्त गरम मातीमध्ये रुतून एका ४८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता ज्वलनशील आणि घातक कचरा उघड्यावर टाकल्याने हा निष्पाप बळी गेल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

​चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे राहणाऱ्या शकुंतला बबन सोनवणे (४८) या १२ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास आपल्या चुलत सुनेसोबत कचरा गोळा करण्यासाठी पुष्कर कंपनीच्या बाहेरील आवारात गेल्या होत्या. कंपनीने प्रक्रियेनंतर बाहेर काढलेली अत्यंत गरम आणि केमिकलयुक्त माती तिथे उघड्यावर टाकली होती. ही माती घातक असल्याचे लक्षात न आल्याने शकुंतला सोनवणे त्या ढिगाऱ्यात पडल्या आणि थेट आतपर्यंत रुतल्या गेल्या.

​या घटनेत शकुंतला सोनवणे यांची साडी आणि कपडे पूर्णपणे जळून खाक झाले, तसेच कमरेपासून खालचा भाग आणि दोन्ही हात गंभीररीत्या भाजले. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्बल १० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, २२ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

​याप्रकरणी मृताची चुलत सून ललिता चंद्रकांत सोनवणे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कंपनीने उघड्यावर टाकलेल्या गरम मातीमुळे कोणाचाही जीव जाऊ शकतो, याची जाणीव असतानाही हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गौतम मखारीया (मालक), सुधाकर जगताप (सेफ्टी मॅनेजर, प्लांट नं. १), सचिन रामकृष्ण मनवाल (एच.आर. मॅनेजर), रविंद्रकुमार सावरमल भुतिया (कमर्शियल मॅनेजर), इतर व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०५ आणि ३(५) या कलमाखाली ​गुन्हा नोंद करण्यात आला. ​या घटनेमुळे लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांच्या घातक कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्थानिक परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.