रत्नागिरी:- 25 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांनी आरोग्य सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरु केले. विशेष म्हणजे आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेविका तसेच समुदाय आरोग्य अधिकारीही या कामबंद आंदोलनात उतरल्याने तेथील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र, शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. जिल्हा परिषदेसमोर सलग 17 दिवस निदर्शने सुरू आहेत.
आरोग्यमंत्र्यांनी या संघटनेच्या पदाधिकार्यांच्या समवेत 31 ऑक्टोबर रोजी त्यांचे दालनात कंत्राटी कर्मचार्यांच्या समायोजनाबाबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आरोग्य विभागात दरवर्षी रिक्त होणार्या नियमित पदांवर सरळ सेवेने भरण्यात येणार्या कोट्यापैकी सरळसेवेने 70 टक्के व उर्वरित 30 टक्के पदांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त सलग सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचार्यांचे समायोजन करण्यासाठी क्याची अट शिथिल करणे व आरोग्य विभागातील नियमित पदांसाठी सेवा प्रवेश नियमाप्रमाणे आवश्यक ते बदल/दुरुस्ती करुन मान्यता प्राप्त करुन घेण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. शासनास प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरु असल्याने हे आंदोलन तत्काळ मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय या कर्मचारी, अधिकार्यांनी घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील 795 कंत्राटी अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेसमोर सलग 17 दिवस शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत त्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. आशांच्या संप माघारीमुळे थोडा दिलासा
गेले काही दिवस आशा व गटप्रवर्तक संपावर गेल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली होती. त्यात कंत्राटी आरोग्य सेविका व इतर कर्मचारीही संपावर गेल्याने भर पडली होती. मात्र गुरूवारी आशा व गटप्रवर्तकांनी संप मागे घेतल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार थोडासा कमी होणार आहे. यामुळे थोडातरी दिलासा मिळाला आहे.