ओखा एक्सप्रेसमधून इंजिनिअरचा आयफोन लंपास

तब्बल ११ महिन्यानंतर रत्नागिरी पोलिसांकडे गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. अहमदाबाद ते गोवा असा प्रवास करणाऱ्या एका सिव्हिल इंजिनिअरला या चोरांनी लक्ष्य केले असून, त्यांचा तब्बल ९६ हजार रुपये किमतीचा ‘आयफोन १६’ रेल्वे प्रवासात लंपास करण्यात आला. या चोरीचे लोकेशन रत्नागिरी स्टेशन असल्याचे निष्पन्न झाल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रितेश विश्वास देसाई (वय २३, व्यवसाय स्थापत्य अभियंता) हे मूळचे मडगाव (गोवा) येथील असून सध्या बंगलोर येथे वास्तव्यास आहेत. २७ जानेवारी २०२५ रोजी रितेश हे ओखा एक्सप्रेसने (ट्रेन क्र. १६३३७) अहमदाबादहून गोव्याला जात होते. पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात आली असताना रितेश आपल्या सीटवर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून पांढऱ्या रंगाचा महागडा आयफोन अत्यंत शिताफीने चोरून नेला.

मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर रितेश देसाई यांनी ईमेलद्वारे गोवा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार कोकण रेल्वे पोलीस स्टेशन, मडगाव (गोवा) येथे ‘झिरो नंबर’ने गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ही घटना रत्नागिरीच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गोवा पोलिसांनी या गुन्ह्याची कागदपत्रे रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवली.

​या प्रकरणी २६ डिसेंबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस आता या चोरीचा अधिक तपास करत असून रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.