ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी

खेड:- कंपनीत रक्कम गुंतवल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवत तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील एकास १६ लाख ४१ हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी जेरबंद केलेल्या राजेशभाई मंगेशभाई अहिरे (३३, रा. सुरत-गुजरात) या भामट्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. फसवणुकीतील रक्कमेचा अद्याप सुगावा लागलेला नसून ही रक्कम हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

चिंचघर-प्रभूवाडी येथील सचिन सदानंद सावंत यांच्या मोबाईलवर ४ प्रकारच्या मोबाईलवरून एसएमएस पाठवत मॉर्गन स्टेनली ई ट्रेडींग कंपनीत रक्कम गुंतवल्यास रक्कमेवर जादा/परतावा देण्याचे आमिष दाखवल्यानंतर त्यांनी वेळोवेळी अज्ञात व्यक्तींच्या खात्यांवर रक्कम जमा केली होती. १६ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाणेत तक्रार नोंदवली होती. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भामट्याच्या सुरत येथे शिताफीने मुसक्या आवळल्या. भामट्याकडून फसवणुकीतील रक्कम अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. या रकमेबाबत पोलिसांनी विचारणा केली असता भामटा विसंगत उत्तरे देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे रक्कम हस्तगत करण्याचे आव्हानच पोलिसांसमोर उभे ठाकले असून पोलीस कसून तपास करत आहेत. भामट्याचे आणखी कारनामे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कंबर कसली असून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.