ऑनलाईन गमावलेले 75 हजार शहर पोलिसांमुळे मिळाले परत

रत्नागिरी:- ऑनलाईन कर्ज मिळवण्याच्या नादात आपल्याच खात्यातील सुमारे 75 हजार 400 रुपये गमावून बसलेल्या तरुणाला शहर पोलिसांनी त्याची रक्कम मिळवून दिली. ही घटना जानेवारी 2021 मध्ये घडली होती.

मंदार संभाजी पाटील (25, रा.तांबटआळी,रत्नागिरी) असे त्या तरुणाचे नाव आहे.जानेवारी महिन्यात ऑनलाईन कर्ज मिळण्यासाठी तो प्रयत्न करत असताना त्याला धनी लोन या संकेतस्थळावर मनी फायनान्स कंपनीकडून फोन आला.बोलणार्‍याने मी मनी फायनान्स कंपनीकडून बोलत असून तुम्हाला कर्ज मिळवून देतो असे सांगितले.त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मंदार पाटील यांनी विचारण्यात आलेली सर्व माहिती व आपल्या बँक खात्याची सर्व माहिती फोन करणार्‍या तोतयाला दिली.

त्यानंतर काही वेळाने मंदार पाटील यांच्या खात्यातूनच 75 हजार 400 रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.याप्रकरणी शहर पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा त्यांना ती रक्कम हरियाणामधील एका तिर्‍हाईत व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाल्याचे समजले.पोलिसांनी ते खाते न्यायालयाच्या आदेशाने सील केले.सर्व कायेदेशिर सोपस्कार पार पडल्यानंतर ते पैसे मंदार शहर पोलिसांनी मिळवून दिले असून मंदारची फसवणूक करणार्‍याचा शोध पोलिस घेत आहेत.हा तपास पोलिस अधिक्षक डॉ.मोहिकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी,पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले,महिला पोलिस नाईक वैदेहि गुरव आणि विलास जाधव यांनी केला.