ऑनलाईन क्लासच्या नावाखाली 80 हजारांची फसवणूक

रत्नागिरी:- अबॅकस क्लासची ऑनलाईन फी देण्याच्या बहाण्याने शिक्षिकेच्याच खात्यातील 80 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली. फसवणुकीची ही घटना खेडशी येथे घडली आहे.

 याप्रकरणी प्रवीण कुमार याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात दीप्ती दत्ताराम साबळे (32 ,रा.खेडशी श्रीनगर, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,दीप्ती साबळे एबॅकस क्लास घेतात. शुक्रवारी सायंकाळी प्रवीण कुमारने साबळे यांना फोन करून आपल्या दोन मुलांची एबॅकससाठी ऍडमिशन करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर फि भरण्यासाठी गुगल पे वरून प्रथम 2 रुपये पाठवून साबळे यांना चेक करण्यास सांगितले. त्यावर साबळे यांनी पैसे जमा झाल्याचे प्रवीणला सांगितले. दीप्ती साबळे यांचा विश्वास संपादन केल्यावर प्रवीणने त्यांच्या मोबाईलवर ऍडमिशन फीची रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकून ती क्लिक करून पासवर्ड टाकायला सांगितले.साबळे यांनी पासवर्ड टाकल्यानंतर प्रवीण कुमारने गुगलपे द्वारे साबळे यांच्या खात्यातील 79 हजार 240 रुपये आपल्या खात्यात जमा करून फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.