खेड:- खेड तालुक्यातील आपेडे फाटा येथे शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई दुपदरी मार्गावर एसटी बस आणि मारुती कारची टक्कर झाली. यानंतर कार चालकाने आणि त्याच्या साथीदारांनी एसटी बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश विठ्ठल चौरे (२७, रा. एसटी डेपो रेस्ट रुम, गोळीबार मैदान, खेड) हे शुक्रवारी सकाळी आंबेजोगाई आगाराची (क्र. ए पी ६१६५) बस घेऊन खेड बसस्थानकातून प्रवासी भरून माणगावच्या दिशेने निघाले होते. भरणे नाका मार्गे गोवा-मुंबई दुपदरी रस्त्यावर आपेडे फाटा येथे आले असता, त्यांच्या पुढील दोन नंबरच्या लेनवर महाडच्या दिशेने जाणारी मारुती कार (क्र. एमएच ०६ सी पी ६००६) चा चालक रोहन राजेश टेमकर याने अचानकपणे पुढे चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक केले आणि तो बसच्या लेनमध्ये घुसला.
यामुळे फिर्यादी चौरे यांच्या ताब्यातील एसटी बसची धडक कारच्या मागील बाजूच्या इंडिकेटरला लागली आणि तो फुटला. या गोष्टीचा राग आल्याने कार चालक रोहन राजेश टेमकर आणि त्याच्यासोबत असलेले मितेश राजेश टेमकर व दर्शन जयवंत मयेकर (तिघेही रा. पोयनाड, ता. अलिबाग) यांनी फिर्यादी चौरे यांना कर्तव्यावर असताना शिवीगाळ आणि दमदाटी केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी चौरे यांना हाताचे ठोसे आणि थापडांनी डोक्यावर, दोन्ही गालांवर, मानेवर आणि हातावर मारहाण केली.
आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने अडथळा निर्माण केला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर फिर्यादी आकाश चौरे यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रोहन राजेश टेमकर, मितेश राजेश टेमकर आणि दर्शन जयवंत मयेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









