साखरपा बसस्थानकातील दुर्घटना
साखरपा:- साखरपा बसस्थानकात एसटी बस फलाटावर लावत असताना घडलेल्या एका दुर्घटनेत तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (२० सप्टेंबर) दुपारी १२:४५ च्या सुमारास घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात काही वेळ प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
कोल्हापूर डेपोची रत्नागिरी-कोल्हापूर ‘शिवाई’ बस (क्रमांक: एमएच १२ झेड ई ८९५३) साखरपा बसस्थानकातील फलाटावर लावली जात होती. याच दरम्यान, मोर्डे-लाडवाडी येथील रहिवासी असलेले संजय रामचंद्र मांडवकर (वय ३८) यांचा तोल गेल्याने ते बसच्या पुढील बाजूला आले. बसच्या पुढील चाकाचा जोरदार धक्का बसल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
दुर्घटना घडल्यानंतर परिसरात तात्काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पावसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे यांच्या मदतीने जखमी संजय मांडवकर यांना तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर पायाची दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथे हलविण्यात आले. यावेळी महेश चाचणे (रा. हुपरी) हे बस चालवत होते. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत आणि कशी घडली? याबाबतची सविस्तर शहानिशा सध्या साखरपा पोलीस करीत आहेत.









