रत्नागिरी:- शहरातील गाडीतळ येथे एसटीबस चालकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या तिघांना न्यायालयाने २ वर्षे कारावास व २ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सचिन भिकाजी रायकर (४४, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), महेंद्र महादेव फणसे व सिद्धेश अनंत धुळप अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना १० फेब्रुवारी २०१९ रात्री नऊच्या सुमारास घडली होती.या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. फणसेकर यांनी युक्तीवाद केला
सरकारी कामात अडथळा व शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्यातील माहितीनुसार रत्नागिरी आगारातील शहर एसटी बस चालक सतिश नरहरी पाडाळकर (४६, रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी) हे १० फेंब्रुवारी २०१९ ला सायंकाळी शहरानजीकच्या काळबादेवी ते रत्नागिरी बसस्थानक अशी बस चालवित घेवून येत होते.
पाडाळकर हे एसटी बस घेवून गाडीतळ येथे आले असता दुचाकीवरील तिघा आरोपींनी आमच्या अंगावर गाडी घालतोस काय असे म्हणत बस थांबविली. यावेळी बसचालक व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली. आरोपी यांनी हाताच्या थापटाने मारहाण केली. अशी तक्रार पाडाळकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध भादवी कलम ३५३, ३४१,३३२, ५०४, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी न्यायालयापुढे दोषारोप पत्र दाखल केले होते.
सोमवारी (ता. २४) या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. फणसेकर यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने तिनही आरोपींना २ वर्षे कारावास व २ हजार ७०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयापुढे पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे व हवालदार साळवी, मोहिते यांनी काम पाहिले.