खेड:- तालुक्यातील एमआयडीसीतील ‘एमआयआरसी’ कंपनीतील ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सचिन रामसिंहजीवन चौहान (२१, असगणी-खेड) या मुख्य सूत्रधाराकडून ८५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. चोरीप्रकरणातील अन्य दोन पसार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील साहित्य चोरीप्रकरणातील सचिन चौहान हा पसार होता. जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तालुक्यातील लवेल येथे गस्त घालत असताना सापळ्यात सापडला. अट्टल गुन्हेगार असलेल्या सचिन चौहान हाच कंपन्यांमधील साहित्य चोरीप्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. अन्य ४ साहित्य चोरीप्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘एमआयआरसी’ कंपनीतील साहित्य चोरीप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीः पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी सचिन चौहान या मुख्य सूत्रधाराचे चोरीप्रकरणातील कारनामे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपासाला गती दिली आहे. पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याच्याकडून ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. अन्य दोन संशयितांच्या मागावर पोलीस आहेत. त्यांनाही गजाआड करण्यात लवकरच यश येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी व्यक्त केला.