रत्नागिरी:- चिपळूण शहरातील भोगाळे येथील युनियन बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल १४ लाख ६० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पाचजणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आले आहे. त्यांच्या कडून ४ लाख ५ हजार रु. जप्त करण्यात आले आहेत. तर अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी एटीएम फोडले होते. मात्र रत्नागिरी पोलीसांनी चार दिवसात आरोपींना गजाआड केले असून त्यांनी पुणे ग्रामीणच्या हद्दीतही एटीएम फोडल्याची कबुली पोलीसांना दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि.३१ ऑगस्टला जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. प्रत्येकजण आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करत असल्याची संधी साधत उत्तर प्रदेश मधील टोळीने गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुरमारास चिपळूण शहरातील भोगाळे परिसरातील परशुराम पार्क बिल्डींगमध्ये असलेल्या युनियन बँकेच्या एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून , त्या मधील १४ लाख ६० हजार रु.ची रोकड लंपास केली होती. त्यानंतर चिपळूण पोलीस स्थानकात कलम ३८०, ४६१ , ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता . तद्नंतर तपासात त्यामध्ये कलम ४३५ भा.दं.वि.सं. या कलमाचा समावेश करण्यात आला .
गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांना तपासाची दिशा निश्चित केली होती. या गुन्ह्याचा तपास चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी , यांच्याकडे दिला. गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सदाशिव वाघमारे , पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शाखा , रत्नागिरी श्री . हेमंतकुमार शहा व पोलीस निरीक्षक चिपळूण पोलीस ठाणे रविंद्र शिंदे , तसेच ७ सहाय्यक पोलीस निरीक्षक , १ पोलीस उपनिरीक्षक आणि अनेक अनुभवी व निवडक पोलीस अंमलदार यांची एकुण १२ तपास पथकांची स्थापना केली , या पथकात अंगुली मुद्रा , डॉग स्का@ड तसेच तांत्रीक विश्लेषण शाखा अशा कौशल्य असणार्या पोलीसांचा समावेश होता . घडलेला गुन्हा व वरील पोलीस अधिकारी यांचा अनुभव विचारात घेऊन , त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी देवून त्यांना ठराविक उद्दीष्टे देण्यात आली तसेच सर्व तपास पथकांना एकमेकांच्या संपर्कात राहुन संवादामध्ये तुटकता येऊ नये याची काळजी घेण्यात आली .
गुन्हयाचे घटनास्थळावरुन प्राप्त माहिती तसेच राज्यातील इतर जिल्हयात अशा प्रकारच्या घडलेल्या गुन्हयांच प्राप्त माहिती तसेच वेगवेगळ्या तांत्रीक बाबींचे विश्लेषण करून मिळालेली माहिती आणि तपास पथकातील समाविष्ठ सर्व अधिकारी व अंमलदार यांनी दिवस ‚ रात्र घेतलेल्या मेहनतीने गुन्हयाची माहिती मिळाल्यापासुन २४ तासाचे एटीएम फोडल्याचा गुन्हा उघड केला आहे. या व्यतिरीक्त सदर गुन्हयाचे तपासात खेड पोलीस ठाणे पासुन ते राजापुर पोलीस ठाणे पर्यंतचे जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा उघड करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेला आहे .
मुळचे उत्तर प्रदेशमधील असलेल्या पाचजणांचे पुर्वी विविध व्यावसाय होते. अनेक वर्षांपुर्वी ते मुंबईत येवून व्यावसाय करत होते. मात्र कोरोना कालावधित प्रादु्र्भावमुळे सर्व व्यावसाय ठप्प झाले. पुन्हा व्यवहार सुरु झाल्यानंतर यांचे व्यावसाय पुन्हा उभे राहिले नाहीत. त्यामुळे पाचजणांमधील वासिफ साबिर अली ( रा.संगमनगर, एन्टॉप हील,मुंबई, मुळ उत्तरप्रदेश) याने आपल्या विविध व्यावसायातील साथिदारांना सोबत घेवून सुलभरित्या पैसे मिळविण्यासाठी एटीएम मशीन फोडण्याचा प्लॅन तयार केला. त्यामध्ये इरफान आयुब खान (वय ३९ वर्षे , रा. खोली क्र. ६ , अनिसा बानु चाळ नं. २ , शास्त्री नगर, कलिना, मुंबई मुळ रा. रेऊआ, ता. जि. प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश), शादाब मकसुद शेख ( वय ३५ वर्षे, व्यवसाय वाहन चालक, सांताक्रुज ( पुर्व ), मुंबई , मुळ रा .उत्तर प्रदेश ) यांच्यासह अन्य दोन साथिदारांना सोबत घेतले होते.
पुणे ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत एटीएम मशीन फोडण्यात हि टोळी यशस्वी झाली होती. त्यानंतर ते काही दिवस शांत राहिले. पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू न शकल्याने त्यांचे धाडस वाढले होते. अटक केलेल्यामधील इरफान खान याचा गाडीचा व्यावसाय असल्याने त्याला कोकणातील दोन्ही जिल्ह्यांची माहिती होती. त्यामुळे त्यांनी मुंबई गोवा महामर्गावरील एटीएम फोडण्याचा प्लॅन तयार केला होता. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यात येवून मुक्काम करुन चिपळूण शहराची रेखी केली. कोणते एटीएम केव्हा फोडले पाहिजे यांचा अभ्यास करुन त्यांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसाची पहाट चोरी साठी निश्चित करुन एटीएम मशीन फोडली.
शादाब शेख याचा गॅस कटरचा व्यावसाय असल्याने त्यांने अत्यंत कमी वेळात मशीन कापून त्यातील १४ लाख ६० हजारांची रोकड बाहेर काढली. त्यानंतर ते इनेव्हा गाडीतून निघाले. सुरुवातील महामार्गावरून न जाता त्यांनी गुहागर मार्गावरुन जाणे पसंत केले. पोलीसांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर गोव्याच्या दिशेने जाताना त्यांनी पैसे वाटून घेतले. व त्यातील दोघे इतर ठिकाणी निघून गेले. तर इरफान खान, वासिफ अली, शादाब शेख हे इनोव्हा गाडीतून गोव्याला मौजमजा करण्यासाठी निघून गेले होते.
सपोनि. श्री प्रविण स्वामी ( स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ) आणि सपोनि. श्री. अमोल गोरे ( राजापूर पोलीस ठाणे ) यांच्या संयुक्त पथकाला या गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे गोव्याच्या दिशेस असल्याची माहिती मिळाली .दोन्ही अधिकार्यांचे पथक पहाटे गोव्याच्या दिशेने रवाना झाले. रवाना झालेवर महत्प्रयासाने व युक्त्यांचा उपयोग करुन, गुन्हा केलेल्या तिघांना या पथकात असलेल्या पोह. विजय आंबेकर, सागर साळवी, बाळू पालकर, रमीज शेख, पोना. योगेश नार्वेकर, चालक पोना. दत्तात्रय कांबळे , पोशि. निलेश शेलार या पथकाने गोवा येथुन ताब्यात घेतलेले आहे.
आरोपींकडुन चोरीस १४ लाख ६० हजारांपैकी ४ लाख ५ हजार २९०रोख रक्कम. तसेच सदर गुन्ह्यांत वापरलेली इनोव्हा गाडी, तीन मोबाईल असा १४ लाख ८५ हजार २९० रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.