Monday, July 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी एटीएममध्ये हातचलाखी करत वृद्धाची २० हजारांची फसवणूक

एटीएममध्ये हातचलाखी करत वृद्धाची २० हजारांची फसवणूक

अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल

सावर्डे:- सावर्डे (ता. चिपळूण) येथील एस.बी.आय. बँकेच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने वृद्धाच्या ए.टी.एम. कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून २० हजार ७०० रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी १७ जुलै रोजी अज्ञात भामट्याविरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीताराम तुकाराम लांबे (वय ७२, रा. कोसबी मंढे, लांबेवाडी, ता. चिपळूण) हे १६ जुलै रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ च्या सुमारास सावर्डे येथील एस.बी.आय. बँकेच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी इसमाने “मी तुमचे पैसे काढून देतो,” असे सांगून त्यांना विश्वासात घेतले.

भामट्याने फिर्यादीकडून ए.टी.एम. कार्ड घेतले आणि पासवर्ड चोरून पाहिला. त्यानंतर हातचलाखी करून फिर्यादीचे मूळ कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांना दुसरेच बनावट ए.टी.एम. कार्ड देऊन तिथून निघून जाण्यास सांगितले. फिर्यादी तिथून गेल्यानंतर त्या भामट्याने लांबे यांच्या खात्यातून एकूण २० हजार ७०० रुपये काढून त्यांची फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सीताराम लांबे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सावर्डे पोलीस या अज्ञात भामट्याचा शोध घेत आहेत.