उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उपचार कक्ष

रत्नागिरी:- उष्णतेच्या लाटेचा परिणाम पुढील काही दिवस राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 67 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उपचार कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उष्माघातामुळे बाधित रुग्णाला आवश्यक उपचार पध्दती करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.

राज्यात उष्माघाताची लाट आली असून त्याचा परिणाम ठिकठिकाणी जाणवत आहे. वाढत्या उष्म्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. अचानक चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे यासारखी लक्षण जाणवतात. दुपारच्या उन्हामध्ये फिरल्यामुळे अनेकांचा हा त्रास जाणवतो. ग्रामीण भागामध्ये मजुरीची कामे करणार्‍यांनाही याची झळ बसू शकते. शरीराचे तापमान वाढल्यानंतर थकवा जाणवतो आणि संबंधित रुग्णाची स्थिती गंभीर होते. असा रुग्ण अचानक आल्यास त्याला तात्काळ उपचार मिळाले पाहीजेत. यासाठी ग्रामीण स्तरावर आरोग्य यंत्रण सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उपचार कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये वातानुकूलन व्यवस्था, बर्फाच्या बॅग, थंड पाणी, सलाईन यासह उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे तिथे ठेवण्यात येणार आहेत. याबाबत गुरुवारी (ता. 20) झालेल्या तालुका वैद्यकिय अधिकार्‍यांच्या बैठकीत डॉ. आठल्ये यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरु झाली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त सुचनेनुसार दरदिवशी उष्माघात झालेल्या रुग्णांची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाही बाधिताची नोंद झाली नसल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.