रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या मूळगावी दाखल होत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. महिनाभर बहुतांशी रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकींग फुल्ल झाले असून बहुतांशी गाड्यांची तिकीटे सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या आसपास प्रतीक्षेत आहेत. तर काही गाड्यांची वेटींग लिस्टही फुल्ल झाल्याने बुकिंग बंद करण्यात आले आहे.
सध्या रेल्वे स्थानकावरील तिकीट केंद्रावर प्रवाशांची तिकीटांसाठी मोठी गर्दी होत असून तिकीट केंद्रासमोर तासन्तास प्रवाशांना वेटींग करावे लागत आहे. कोरोना काळानंतर कोकण रेल्वे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा देत आहे. सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्याने मुंबईकर चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावी दाखल होत आहेत. मे महिन्यात गावी लग्न समारंभ तसेच धार्मिक कार्यक्रमांना मुंबईकर चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. सध्या मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे व अन्य भागातून चाकरमानी मंडळी गावी दाखल होत आहेत. खासगी आराम बस, अन्य खासगी वाहनांनी गावी येणार्यांपेक्षा कोकण रेल्वेने येणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे गाड्या सध्या हाऊसफुल्ल धावत आहेत.
बहुतांशी रेल्वे गाड्यांचे तिकीट एक -दोन महिने आधीच बुकींग केलेली आहेत. तर बरेच जण एक दिवस आधी तत्काळ तिकीटे काढून गावी दाखल होत आहेत. तर वेटींग तिकिटांसाठीही मोठी रांग आहे. मुंबईहून येणार्या बहुतांशी रेल्वे गाड्यांच्या तिकिटांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास वेटींग आहे. एप्रिल महिन्यात गावी आलेले चाकरमानी मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचीही तिकिटांसाठी गर्दी होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकावर सध्या तिकीटासाठी चाकरमानी व प्रवाशांची गर्दी होत आहे. दिवा -सावंतवाडी गाडीच्या अनारक्षित (जनरल) तिकीटांसाठीही प्रवासी धावाधाव करीत आहेत. उर्वरित सर्वच गाड्यांच्या आरक्षित तिकीटांसाठी प्रवासी रेल्वे स्थानकांवरील तिकीट केंद्रासमोर गर्दी करीत आहेत.