उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची कैद

रत्नागिरी:- प्रसिद्ध उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (३१) आणि नरसिंग दशरथ कारभारी (३०,दोन्ही रा. दहिसर मुंबई) या दोघांना येथील न्यायालयाने बुधवारी २ वर्ष ६ महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या आरोपींवर राज्यात ५५ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने दोघांना अथक प्रयत्नांनी ताब्यात घेतले होते.

जागतिक बाजारपेठेत मत्स्य प्रक्रिया उद्योगात ठसा उमटविणारे रत्नागिरीचे उद्योजक दीपक गद्रे यांना  दि.१३ ऑक्टोबर २०१८ रोजी फोन करुन आम्ही एका व्यक्तीला रिव्हाॅल्वरसह अटक केले असून, तो तुम्ही पिस्तुल मागविल्याचे सांगत आहे. यात तुम्हाला ताब्यात घ्यायला नको असेल, तर वीस लाख रुपये द्या, मी पालघरमधून पोलीस निरीक्षक बोलतोय असा फोन निशांत परमार यांने दोन वेळा गद्रे यांना केला होता. दिपक गद्रे यांनी याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थाकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या पथकाने परमारचा साथीदार नरसिंग कारभारी याला २० लाख रु.ची खंडणी घेताना मुंबईत रंगेहात पकडले होते. यावेळी संशय आल्याने परमार त्याठिकाणाहून निसटला होता.
 

तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक विविध माहितीच्या आधारे परमारचा माग काढत होते. मुळचा दहिसर येथे रहायला असणारा निशांत परमार हा त्या ठिकाणी काही महिन्यापासून वास्तव्याला नव्हता. पोलिसांना सुगावा लागू नये यासाठी तो स्लीपर लक्झरी गाडीमधून रात्रीचा प्रवास करीत असे. रात्री कधीही हॉटेल व लॉजवर तो वास्तव्य करीत होता. मुंबई पोलिसांनी त्याला अनेक गुन्ह्यात अटक केली होती. त्यामुळे पोलिसांची कार्यपध्दती त्याने जवळून पाहिली होती. त्यामुळे काही दिवस नाशिक, मुंबई, सोलापूर, बंगळूर, बडोदा, बीड असा प्रवास करीत पोलीसांना गुंगारा देत होता. परमार कोल्हापूर येथे येणार असल्याची पक्की खबर ग्रामीण पोलीसांना मिळाली होती. विशेष टिमने परमारला कोल्हापुरात मोठ्या शिताफीने जेरबंद केले. तपास पुर्ण  झाल्यानंतर ग्रामीण पोलीसांनी दोघांविरुद्ध भादंविक कलम १७०, ३८४, ४१९, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. गुन्हा घडल्या पासून दोघेही न्यायालयीन कोठडीतच होते.

याप्रकरणी निकाल देताना बुधवारी न्यायालयाने दोघांना  २ वर्ष ६ महिने साधी कैद आणि १ हजार रुपये दंड तो न भरल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाकडूूून अ‍ॅड.एस.एस.वाधवणे, ऍड मुजावर आणि अ‍ॅड.प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. तसेच तपासिक अंमदलार म्हणून ग्रामीणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन ढेरे, पोलिस नाईक अमित कदम, संदिप काशीद, हेड काँ.दिडपिसे, पोलिस नाईक विलास जाधव, रमिज शेख, सुभाष माने यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अनंत जाधव आणि मदतनीस म्हणून पोलिस नाईक संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.