रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी शहरातील पडवेकर कॉलनी, उद्यमनगर येथे बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लांबवणार्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या. त्याच्याकडून चोरीचा शंभर टक्के मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
लियाकत अब्दुल्ला नावडे (45, रा. कोकण नगर बगदादी चौक, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीचे विविध 11 गुन्हे दाखल आहेत. 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत उद्यमनगर येथील बंद घर फोडून अज्ञाताने सोन्याचे 1 लाख 66 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी या दाखल गुन्ह्याचा तपास करण्याकरिता तात्काळ एक पथक तयार केले. या पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू असताना नमूद गुन्हा हा रेकॉर्ड वरील अट्टल आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे याने केलेला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपीला बुधवार 28 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 66 हजारांचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे, पोलिस हेड काँस्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, सागर साळवी, महिला पोलिस हेड काँस्टेबल वैष्णवी यादव, पोलिस नाईक दत्ता कांबळे यांनी केली आहे.









