रत्नागिरी:- ओला कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत तुमच्या गाडीचे काम करण्यासाठी आधी पैसे भरावे लागतील असे सांगत प्रौढाकडून गुगल पे व्दारे तीन वेळा पैसे घेउन 17 हजार 806 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटना मंगळवार 30 ऑगस्ट रोजी आदर्शवसाहत येथे घडली आहे.
याप्रकरणी प्रविण पांडे (पूणे) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याविरोधात संदीप पद्माकर नांदगावकर (51,रा.आदर्शवसाहत,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. 23 एप्रिल 2022 रोजी त्यांनी पुणे येथून ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटर दीड लाख रुपयांना ऑनलाईन विकत घेतली होती. स्कुटरचे वायरिंग उंदराने कुरतडल्याने त्यांनी याबाबत ओला कंपनीच्या केअर सेंंटरवर तक्रार नोंदवली होती. दरम्यान, 30 ऑगस्ट 2022 रोजी नांदगावकर घरी असताना दुपारी 1.38 वा. त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आम्ही तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून तो होत नाही आहे, ओला सर्व्हिस केअर पूणे असा मेसेज आला. त्या नंबरवर नांदगावकर यांनी फोन केला असता बोलणार्याने मी प्रविण पांडे बोलत असून तुमची स्कुटर आमच्याकडे कामाला आलेली आहे. तिचा इन्शुरन्स आहे का असे विचारुन तुम्हाला आधी कामाचे पैसे भरावे लागतील व नंतर इन्शूरन्स क्लेम केल्यावर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नांदगावकर यांनी प्रविण पांडेने पाठवलेल्या गुगल पेच्या लिंकवर सायंकाळी 4.15 वा. तीन वेळा असे एकूण 17 हजार 806 रुपये पाठवले. त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वा.नांदगावकर यांच्या मोबाईलवर पुन्हा फोन आला. बोलणार्याने मी पूणे येथील ओला कंपनीतून धवल बोलत असून तुमच्या ई स्कुटरचा खर्च 12 ते 13 हजार रुपये होईल असे सांगितले. तेव्हा नांदगावकर यांनी काही वेळापूर्वी मी तुमच्याच कंपनीतील प्रविण पांडेशी बोललो असून गुगल पे व्दारे पैसे पाठवल्याचे सांगितले. तेव्हा धवल यांनी आमच्या कंपनीत प्रविण पांडे नावाचा कोणीही काम करत नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदीप नांदगावकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर सुर्य करत आहेत.