रत्नागिरी:- रत्नागिरीकडे गांजा येणाऱ्याच्या रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सत्यजित सदाशिव सत्यजित जाधव जाधव (वय ३४, रा. विकासनगर, इचलकरंजी) याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सकाळी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून नऊ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी तो बसमधून प्रवास करीत होता; मात्र पोलिसांनी बस अडवून गांजासह त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित जाधव लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने सध्या बेरोजगार होता. तो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच तो गांजा घेऊन रत्नागिरीकडे निघाल्याची माहिती अंमलदार सागर चौगले यांना प्राप्त झाली. त्यांनी पोलिस निरीक्षक कळमकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी एक पथक सांगली फाट्याजवळ तैनात केले होते.
रत्नागिरीला गांजा पोहोचविण्यासाठी जाधवने बसचा मार्ग निवडला होता. इचलकरंजीतून एका बसमध्ये बसला. तो सांगली फाट्यावरून पुढे जाणार असल्याने पथकाने याच ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून नऊ किलो गांजा व इतर साहित्य असा दोन लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
जाधव याने गांजा कोठून आणला, याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याने ओरिसा येथे जाऊन गांजा आणल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्याकडे बसची तिकिटेही मिळाली असून, त्याला गांजा देणाऱ्यांचा शोध आता घेण्यात येणार आहे. गांजा विक्रीच्या मुळापर्यंत जाणार असल्याचेही कळमकर यांनी स्पष्ट केले.