आशा, गट प्रवर्तक महिलांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा 

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना यापूर्वीच ७८ कामे कामावर आधारित नेमून देण्यात आलेली आहेत. तसेच गटप्रवर्तक महिलांना सुद्धा कामे नेमून देण्यात आलेली आहेत. असे असताना ७८ कामाशिवायही अनेक वेळा आरोग्य अधिकारी स्वतःच्या मनाला येईल ते काम आशा महिलांना करण्यास सांगतात. त्या कामाचा कसलाही मोबदला आशांना मिळत नाही. अशातच ‘आभा’ अर्थात डिजिटल आरोग्य काढून देण्याबाबत आदेश आलेले आहेत. हे काम आशा कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक महिलांनी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापरिषदे वर धडक मोर्चा काढला.

यावेळी शिष्ट मंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .अनिरुध्द आठल्ये यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या ७८ कामे करणे साठीच आशा महिलांना दररोज आठ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. शिवाय कामावर आधारित मोबदला मागील अनेक वर्षापासून वाढवण्यात आलेला नाही. अशातच आरोग्य ओळख पत्र  काढून देण्याबाब परिपत्रक आलेले आहे. या कामासाठी एक कार्ड काढण्यासाठी दहा रुपये दिले जाणार आहेत. असे परिपत्रकात  नमूद करण्यात आलेले आहे. परंतु हा मोबदला अत्यंत कमी आहे.

आरोग्य ओळखपत्र काढण्याचे काम आशा महिलांनी करावे असे परिपत्रक सहसंचालक आरोग्यसेवा यांनी काढलेले आहे. परंतु आशा व गटप्रवर्तक महिला या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करतात. त्यामुळे आशांना काम करण्याचा आदेश देणे सहसंचालक आरोग्य सेवा यांना अधिकार नाहीत. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशांना हे काम देण्याबाबतचा आदेश काढलेला नाही. इतकेच नव्हे तर आशा महिलांना अद्यापही मंजूर असूनही राष्ट्रीय आरोग्य अभियाना मार्फत अँड्रॉइड मोबाईल दिलेला नाही. आणि हे आरोग्य ओळख पत्र काढण्याचे काम मोबाईलद्वारे करावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर सर्वच आशा महिलांना मोबाईलवर आरोग्य ओळख पत्र काढून देणे शक्य नाही. परंतु आतापासूनच परिपत्रक काढून अनेक जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी हे काम केलेच पाहिजे असे आशांना सांगत आहेत.

दरम्यान जिल्ह्यांमध्ये तीन वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये काम करून घेतलेले आहे. परंतु मोबदला अद्याप दिलेला नाही. माझे कुटुंब माझी रत्नागिरी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करून घेतलेले आहे. पण कामाचा मोबदलाही अद्याप दिलेला नाही.

.महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यांमध्ये सरकारी अथवा खाजगी दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी १४ हजार ७०६ रुपये इतके दरमहा किमान वेतन घोषित केलेले आहे. या किमान वेतनानुसार ७८ कामे करण्यासाठी आशा महिलांना किमान इतके वेतन देणे आवश्यक आहे. त्यानुसार नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ मध्ये आरोग्य ओळख पत्र  काढून देण्यासाठी २९ हजार ४१२ इतकी रक्कम कार्ड काढण्यासाठी प्रत्येक आशा महिलेस देणे कायद्यानुसार शासनावर बंधनकारक आहे. शिवाय कायद्याने जितके किमान वेतन लागू आहे ते किमान वेतन ओव्हर टाईम काम केल्यास दुप्पट द्यावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून हे काम आशा महिलांच्या कडून करून घ्यावे. ज्या आशा महिलांना शक्य होईल त्यांच्याकडूनच हे काम करून घ्यावे. कोणाही आशां महिलाना हे काम करण्याबाबत सक्ती करता येणार नाही.तरी आशा महिलांना आरोग्य ओळखपत्र काढून देण्याबाबत किमान वेतनानुसार मोबदला देण्याबाबत आदेश करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याखेरीज अनेक वर्षे   प्रलंबित असलेल्या इतर २५ मागण्याही निवेदनात नमूद केल्या आहेत . यावेळी आशा, गट प्रवर्तक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.