आर्मी निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

दापोली:- तालुक्यातील वणोशी येथील एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २६ मे ते ३० ऑगस्ट या कालावधीत घडली असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी बाबुराव पाटणे (वय ८३, रा. वणोशी, वाणेवाडी) हे आर्मीचे निवृत्त अधिकारी आहेत. काही कामानिमित्त ते घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या उत्तरेकडील खोलीत असलेल्या गोदरेजच्या कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला.

या चोरीत पाटणे यांचे एक २ तोळ्यांचे सोन्याचे लक्ष्मीहार (८०,००० रुपये), १ तोळ्यांच्या सोन्याच्या कानातील पाट्या (४०,००० रुपये) आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी (२०,००० रुपये) असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

पाटणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.