रत्नागिरी:- जिल्ह्यात दापोली नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी नगरसेवक अन्वर रखांगे यांचा मुलगा फैजान रखांगे याला रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून रविवारी रात्री उशिरा आठ वाजता अटक करण्यात आली. या कारवाई नंतर दापोलीत मोठी खळबळ उडाली आहे.
दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी निलंबित लेखापाल दीपक सावंत याने नगरपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनाही यापूर्वीच पोलिसांनी अटक करण्यात आली होती. तो सध्या जामीनावरती मुक्त आहे. आता याच कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात दापोलीतील नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आल्याने आता पुढचा नंबर कोणाचा याची चर्चा दापोलीत सुरू आहे. दापोली नगरपंचायतीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
याच प्रकरणात फैजान रखांगे यांच्या खात्यावरती दीपक सावंत यांनी जवळपास तब्बल सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा अधीक रक्कम वर्ग केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक फैजान रखांगे यांच्या अटकेसाठी वॉच ठेऊन होते. मात्र फैजान रखांगे गेले काही दिवस भारता बाहेर गेल्याची चर्चा होती. फैजान दापोलीत येताच त्याला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाकडून दापोली येथून अटक करण्यात आली आहे. विद्यमान नगरसेवक अन्वर रखांगे हे जिल्ह्यातील अग्रगण्य सहकार क्षेत्रातील आर्थिक संस्था असलेल्या दापोली अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक आहेत
त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती या अटकेनंतर जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.दापोली नगरपंचायत कर्मचारी दीपक सावंत यांनी दापोली येथील काही विद्यमान लोकप्रतिनिधींच्या पर्यटन दौऱ्यासाठी बुकिंग केल्याची माहिती ही पोलीस तपासात समोर आली आहे. या सगळ्याचे रिसॉर्ट बुकिंग प्रवासाचे फ्लाईट बुकिंग या सगळ्यासाठी वापरण्यात आलेले पैसे हे दीपक सावंत यांच्याच खात्यावरून वर्ग झाल्याची माहिती पोलीस तपास समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून काही बड्या हस्ती पोलिसांच्या रडावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात अजून कोणाचे नंबर लागतात याचीच उत्सुकता अवघ्या जिल्ह्याला लागून राहिली आहे.