तरुणांना गंडा घालण्याचा प्रयत्न; सावधगिरीचा इशारा
रत्नागिरी:- रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या नावाने बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या माध्यमातून राज्यभरातील तरुणांना गंडा घालण्याचा प्रयत्न झाला असून यावर उमेदवारांनी अर्ज करु नयेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांनी केले आहे. 2019 मध्ये ज्यानी अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते, त्यांची लेखी परीक्षा 16 व 17 ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामध्ये सरकारी यंत्रणेमार्फत होणार्या भरत्या, अधिकार्यांची फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे पैसे लाटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या सरकारी खात्यातील नोकर भरत्यांचे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातात. पैसेही तसेच भरुन घेण्यात येत आहेत. याचाच गैरफायदा घेऊन गंडा घालण्यासाठीचे प्रयत्न होऊ लागले आहेत. बनावट वेबसाईट तयार करुन ती सोशल मिडीयावर व्हायरल केली जाते आणि त्या वेबसाईटवर शासनाच्या विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया होत असल्याची खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. त्यावरुन ऑनलाईन पेमेंट केल्यास आपसूक पैसे मिळतात. नोकरीच्या गरजेमुळे अनेक तरुण त्याला बळी पडू शकतात. सध्या आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात अशीच बनावट वेबसाईट बनविण्यात आल्याचे पुढे आले आहे. रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ़ महाराष्ट्र’ या फेक खात्याचा वापर करण्यात आला आहे.
ग्रामविकास मंत्रालयाकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया 2019 साली घेण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्या पेजवर दिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिक्त जागांची संख्या चुकीची आहे. जिल्ह्यात 88 जागा रिक्त दाखवल्या आहेत. अन्य जिल्ह्यांचीही स्थिती तिच होती. प्रत्यक्षातील जागा वेगळ्याच आहेत. 2019 च्या खर्या भरतीसंदर्भातील परिक्षांचेही वेळापत्रक जाहीर झाले आहे. याबाबत डॉ. आठले म्हणाले की, अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल केलेल्यांची लेखी परीक्षा 16 व 17 ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी 1, आरोग्य सेवक- पुरुष- 17, आरोग्य सेवक फवारणी (हंगामी) 46, एएनएम 126, औषध निर्माता 25 जागा रिक्त आहेत. फेक वेबसाईटची शासनाने दखल घेतली आहे.









