जिल्ह्यात 4 हजार शेतकऱ्यांकडून 1 कोटी 32 लाखांची वसुली
रत्नागिरी:- शेतकर्यांसाठी किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ आयकर दाते तसेच निकषात न बसणार्या व्यक्तींनी घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून लाभ परत घेण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 4 हजार 20 शेतकर्यांकडून आतापर्यंत एक कोटी एक लाख 32 हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली असून, सुमारे दीड कोटीची वसुली अजूनही शिल्लक आहे.
केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन तीन टप्प्यांत दिली जात आहे. जिल्ह्यात या योजनेचे 2 लाख 57 हजार 999 एवढे लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ केवळ अल्पभूधारक तसेच ज्यांचे उत्पन्न 10 हजारांच्या आत आहे, अशांना देण्यात येतो. असे असतानाही या योजनेचा लाभ आयकर भरणारे तसेच नवरा – बायको दोघेही नोकरीला असणार्यांकडून घेण्यात आला होता. आधार कार्ड लिंक असल्याने शासनाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे अशा अपात्र शेतकर्यांवर कारवाई करून त्यांना देण्यात आलेली रक्कम परत करण्यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. देशभरातील अशा अपात्र शेतकर्यांची यादी आणि त्यांनी भरावयाच्या रकमेसह यादी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार अशा अपात्र शेतकर्यांकडून पैसे परत घेण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यात कारवाई सुरू झाली आहे. पोर्टलद्वारे ही पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.









