आधी मतदान नंतर शुभमंगल! रत्नागिरीत लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क

रत्नागिरी:- लग्नाचा मुहूर्त साधण्यापूर्वी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क आधी बजावत रत्नागिरीत लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला. जीवन प्राधिकरण मतदान केंद्रावर राहुल शिवलकर तर देसाई हायस्कूल मतदान केंद्रावर समृद्धी सुर्वे हिने मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदान. आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अनिवार्य आहे. याच कर्तव्यनिष्ठेची आणि जागरूकतेची प्रचिती आज रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदानादरम्यान पाहायला मिळाली.

सकाळपासूनच शहरातील मतदान केंद्रे मतदारांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला मोठ्या उत्साहाने आपला हक्क बजावत आहेत. याच उत्साहाच्या वातावरणात, लग्नासाठी सज्ज झालेल्या एका नववधूने आपला मतदानाचा हक्क प्रथम बजावण्याचा निर्णय घेऊन इतरांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.

रत्नागिरी शहरातील देसाई स्कूल येथील मतदान केंद्रावर हा प्रेरक प्रसंग घडला. समृद्धी सुर्वे या नववधूने आपल्या विवाहसोहळ्याला जाण्यापूर्वी थेट मतदान केंद्रावर हजेरी लावली. नटून-सजून, पारंपरिक वेशात असलेल्या समृद्धीने आधी मतदान केले आणि नंतरच ती आपल्या लग्न समारंभासाठी रवाना झाली. तिचे हे पाऊल मतदारांना योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी प्रोत्साहित करणारे ठरले.

यावेळी बोलताना समृद्धी सुर्वे हिने प्रत्येक नागरिकाला आपले मतदान कर्तव्य समजून आपला हक्क बजावण्याचे कळकळीचे आवाहन केले. तिच्या या कृतीतून लोकशाही मूल्यांवरील तिचा दृढ विश्वास आणि नागरिकांप्रतीची जागरूकता स्पष्टपणे दिसून येते. रत्नागिरी नगरपरिषदेच्या या निवडणुकीत, नववधूने बजावलेला हा हक्क निश्चितच मतदारांच्या मनात लोकशाहीप्रती अधिक आस्था निर्माण करणारा आहे.

तसेच साळवी स्टॉप येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर क्रांतीनगर येथील राहुल शिवलकर या नवरदेवाने पारंपरिक नवरदेवाच्या पोशाखात हजेरी लावत मतदान केले.