‘आधी काम, नंतर मंजुरी’; नगरपरिषदेतील कथित गैरप्रकार उघड

माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

रत्नागिरी:- नगरपरिषदेच्या कारभारातील गंभीर अनियमिततेचा आरोप करत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी प्रशासकीय व राजकीय संगनमताने बेकायदेशीर पद्धतीने कामे झाल्याचा दावा केला आहे. आधी प्रत्यक्ष काम पूर्ण करायचे आणि त्यानंतर सर्वसाधारण सभेत त्यास मंजुरी घ्यायची असा धक्कादायक प्रकार नगरपरिषदेत सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला असून, याबाबत त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

३० जानेवारी २०२६ रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ११ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४ मधील न.प. शाळा क्रमांक ३ समोरील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ३० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावातील काम प्रत्यक्षात मंजुरीपूर्वीच पूर्ण झाल्याचा गंभीर आरोप कीर यांनी केला आहे. या दाव्याला दुजोरा देण्यासाठी त्यांनी जिओ-टॅग फोटो व व्हिडिओ पुराव्यादाखल सादर केले आहेत.

कीर यांनी नमूद केलेल्या इतर कामांमध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील व्यायामशाळेचे बांधकाम मंजुरीपूर्वी पूर्ण करणे, अरुण आईस्क्रीम शेजारील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम निविदा मंजुरीपूर्वीच उरकणे तसेच आठवडा बाजार परिसरातील शौचालय सुशोभीकरणाचे काम नियम डावलून आधीच पूर्ण करणे, अशा बाबींचा समावेश आहे.

या प्रकरणामुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अंदाजपत्रक, निविदा, वर्क ऑर्डर आणि प्रत्यक्ष काम या शासकीय प्रक्रियेला पायदळी तुडवत शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या नगरसेवकांनी या कामांना मंजुरी दिल्याचा आरोप कीर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पुराव्यांसह सादर करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर जिल्हाप्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मिलिंद कीर यांनी या प्रकरणात तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, जबाबदार अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची बिले अदा करू नयेत तसेच बेकायदेशीररीत्या राबवलेली निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.