आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना चार वर्ष सक्तमजुरी

रत्नागिरी:- दोन वर्षांपूर्वी लांजा तालुक्यातील पालु बौध्दवाडी येथील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून भिकाजी रत्ना कांबळे (52, रा. पालु बौध्दवाडी लांजा) याला शिवीगाळ व मारहाण करत गाव सोडण्यास सांगितले होते. यातून त्याने 9 एप्रिल 2021 रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने सोमवारी 4 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

संतोष सखाराम कांबळे आणि मिलिंद देवजी कांबळे (दोन्ही रा.पाल बौध्दवाडी लांजा,रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांच्या विरोधात भिकाजी यांचा भाउ विजय रत्ना कांबळे (47,मुळ रा.पालु लांजा सध्या रा.मुंबई) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,त्यांचा भाउ भिकाजी हा अशिक्षित असून तो लांजा येथील घरात एकटाच रहायचा.त्याचे वाडितील एका महिलेच्या घरी येणे जाणे होते.यावरुन त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याच समज करुन घेत संतोष कांबळे आणि मिलिंद कांबळे हे दोघे भिकाजीला वारंवार शिविगाळ व दमदाटी करायचे.याला कंटाळून भिकाजीने जानेवारी 2021 मध्ये लांजा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रारही दिली होती.

परंतू त्यानंतरही 7 एप्रिल 2021 रोजी त्या दोघांनी वाडीतील लोकांसमोर मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली होती.ही बाब भिकाजीचा भाउ विजयला समजताच त्याने मुंबईतून भिकाजीला फोन केला त्याने वाडीतील दोघे आपल्याला वारंवार त्रास देत असल्याचे सांगितले होते.दरम्यान,भिकाजीने वारंवार होणार्‍याला त्रासाला कंटाळून गावचे पोलिस पाटील यांच्याकडे जाउन मी अशिक्षित असल्याने मला पोलिस ठाण्यात तक्रार द्यायची असल्याने तशी चिठ्ठी लिहून द्या असे सांगितले होते.त्यानुसार,पोलिस पाटलांनी त्याला चिठ्ठी लिहून दिली होती.ही चिठ्ठी आपल्या पँटच्या खिशात ठेवून 9 एप्रिल रोजी रात्री भिकाजीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती.

याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात संतोष आणि मिलिंद विरोधात भादंवि कलम 306,506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.याचा तपास लांजाचे पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही.जाधव आणि पोलिस हेड काँस्टेबल एस.वाय.जाधव यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ऍड.प्रफुल्ल साळवी यांनी 13 साक्षिदार तपासत केलेला युक्तिवाद रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधिश एल.डि.बिले यांनी ग्राह्य मानून 4 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस काँस्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिले.