रत्नागिरीः– बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. यावर्षी कोकण विभागातून 35 हजार 637 विद्यार्थ्यांनि दहावीची परीक्षा दिली.
3 मार्चला दहावीची परीक्षा सुरू झाली. रत्नागिरी जिल्ह्यातून 413 शाळामधून 23 हजार 756 विद्यार्थी तर सिंधुदुर्गमधून 228 शाळामधून 11 हजार 881 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार वाढल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर यावर्षी रद्द करावा लागला होता.
कोकण बोर्ड स्थापन झाले यालाही आता दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. आतापर्यंत दहावीच्या निकालात कोकण बोर्डानेच बाजी मारली आहे. स्थापनेपासून आतापर्यंत कोकण बोर्ड निकालात राज्यात अव्वल क्रमांकावरच राहिले आहे. यावर्षी देखील कोकण बोर्ड अव्वल क्रमांकाची परंपरा कायम राखेल मात्र, या निकालानंतर पुढच्या प्रवेशाची प्रक्रिया कशी राहणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
दहावीचा निकाल हा शैक्षणिक वाटचालीतील यशाची पहिली पायरी असते. यावर्षी दहावीचा निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर होईल अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. यानुसार निकालाला अवघे दोन दिवस बाकी आहेत. निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढू लागली आहे.
प्रति वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहावीचा निकाल दोन महिने ताणला आहे. निकाल वेळेत न लागल्याने आणि कोविड 19 मुळे शैक्षणिक वर्षात बदल संभावित आहेत. अशातच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याने आणखी एक महिना वाया जाण्याची शक्यता आहे.