Monday, July 20, 2026
spot_img
Home रत्नागिरी आजीच्या अंत्ययात्रेला जाणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

आजीच्या अंत्ययात्रेला जाणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा तरुण ठार झाला असून, तो आपल्या आजीच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून विजापूरला निघाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामा बाळू माशाळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. रामा माशाळ हा सापुचेतळे येथून दुचाकीने आपल्या गावी विजापूरकडे निघाला होता. पहाटेच्या सुमारास आंबा घाटातील दख्खन बस थांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असताना, अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रामाचा जागीच मृत्यू झाला.

मयत रामाच्या आजीचे निधन झाल्याने, नातेवाईकांनी विजापूरला जाण्यासाठी फोर व्हिलर करण्याचे ठरवले होते. मात्र, रामा माशाळ याने कोणाचेही ऐकले नाही आणि रात्री दीड वाजता दुचाकीवरून एकटाच प्रवासाला निघाला. “माझे ऐकले असते तर माझा भाचा आज जिवंत असता,” अशा शब्दांत रामाचे नातेवाईक बाळू मल्लारी तांबे यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रामा माशाळला तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
​देवरुखचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. सध्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम साखरपा पोलिसांकडून सुरू आहे.